संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट!! वॉचमनच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे

Santosh Deshmukh murder case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आवादा एनर्जी प्रकल्पावर तैनात असलेल्या तीन वॉचमनच्या जबाबामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या जबाबानुसार, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी प्रकल्प व्यवस्थापकाकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी सरपंच देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघे आवादा एनर्जी प्रकल्पात वॉचमन म्हणून कार्यरत होते. एका रात्री सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसह प्रकल्पात आला. यावेळी त्याने तिन्ही वॉचमनना मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेनंतर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

वॉचमनच्या जबाबानुसार, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी आवादा एनर्जी प्रकल्पाचे व्यवस्थापक शिवाजी थोपटे यांच्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास कंपनी बंद करण्याची धमकीही देण्यात आली होती. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि कामगारांचे रोजगार टिकून राहावेत म्हणून सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला.

तसेच, “कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या,” अशी विनंती संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना केली. मात्र, यावर आक्रमक होत घुलेने सरपंच देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत. याप्रकरणात त्यांना महत्त्वाचे साक्षीदार मानले जात आहे. तसेच, सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांनी या साक्षींच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी म्हणून पोलीस प्रयत्न करत आहेत.