सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालात किसन वीर कारखाना बचाव पँनेलचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. त्यानंतर वाई शहरामध्ये कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत नूतन संचालकांची व विजयाचे शिल्पकार ठरलेल्या आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांची जंगी मिरवणूक काढली. गावोगावी निवडून आलेल्या या संचालकांची ग्रामस्थांनी मिरवणुकीद्वारे स्वागत केले. त्यानंतर आज नवनिर्वाचित संचालकांनी कवठे, ता. वाई येथील किसन वीर स्मारकास भेट दिली. स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
कवठे येथील किसन वीर स्मारकास भेट देत नवनिर्वाचित संचालकांनी किसनवीरांच्या आशीर्वादाने पुढील वाटचाल सुरु करीत सांगितले. यावेळी संचालक संजय कांबळे, हणमंत चवरे, सरला वीर, सुशीला जाधव, शिवाजी जमदाडे, रामदास गाढवे,किरण काळोखे, प्रमोद शिंदे, प्रकाश धरगुडे, रामदास इथापे, दिलीप पिसाळ, शशिकांत पिसाळ, हिंदुराव तरडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित संचालक दिलीप पिसाळ म्हणाले, कारखान्यावरील सद्यस्थितीत असलेल्या सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे. पुन्हा नव्याने यंत्रणा कार्यरत करून लवकरात लवकर कारखाना सुरु कसा करता येईल या दृष्टीकोनातून आम्ही कार्यरत आहोत.
यावेळी किसन वीर यांचे गाव असलेल्या कवठे येथील सरपंच व किसन वीर यांचे सुपुत्र श्रीकांत वीर यांनी सर्व उपस्थित संचालकाचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. आभार राहुल डेरे यांनी मानले. कार्यक्रमास महादेव मस्कर, शशिकांत शिंदे तसेच परिसरातील व कवठे गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व कारखाना सभासद उपस्थित होते.