हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. यांसह नवविवाहित जोडप्यांना देखील थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र आता मंदिर समितीने ही सुविधा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी म्हणले आहे की, आता नवदाम्पत्यासोबत तीन जणांनाही थेट दर्शनाची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रातून कित्येक नवविवाहित जोडपी पारंपरिक रीतिरिवाजानुसार पंढरपूरात येऊन विठुरायाचे दर्शन घेतात. पूर्वी या जोडप्यांना दर्शनासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आता त्यांना थेट दर्शन घेता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे 8 फेब्रुवारी रोजी माघ वारी यात्रा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवरच मंदिर समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महत्वाचे म्हणजे, यंदा यात्रेदरम्यान ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन घेता येईल. यासाठी मंदिर प्रशासनाने सहा पत्राशेडची उभारणी अंतिम टप्प्यात आणली आहे. यासह पंढरपूर शहरातील रहिवाशांसाठी मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी स्थानिकांना सकाळी केवळ अर्धा तास दर्शनाची संधी मिळत होती, मात्र आता सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 या वेळेत त्यांना थेट दर्शन मिळणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना गर्दी टाळून सहज दर्शन घेता येणार आहे. खास म्हणजे, मंदिर प्रशासनाने दिव्यांग, अंध आणि वृद्ध भाविकांसाठीही वेगळी सुविधा जाहीर केली आहे. आता दिव्यांग, अंध आणि वृद्ध भाविकांना दर्शनासाठी व्हीलचेअरची सुविधा मिळणार आहे.
दरम्यान, मंदिर परिसरात दर्शनाच्या रांगेत मृत्यू झाल्यास, संबंधित भाविकांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही मंदिर समितीने घेतला आहे. त्याचबरोबर मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च मंदिर प्रशासन उचलणार आहे. अशा महत्त्वपूर्ण निर्णय यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.




