औरंगाबाद : कोरोनाच्या नियंत्रणासाठी शहरात लसीकरण करण्याची जम्बो मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे एक लाख कोरोना लसींची मागणी केली आहे. दरम्यान, सोमवारी एक दिवस पुरेल एवढाच दहा हजार लसींचा साठा शिल्लक होता. मात्र १२ एप्रिल रोजी पुन्हा ३० हजार लसींचा डोस पालिकेला मिळाला आहे. त्यामुळे जम्बो मोहीम कायम ठेऊन यात एनजीओ, संस्थांची मदत घेणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.
राज्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद शहरातही मागील चार दिवसांपासून मागणी करुनही लसींचा पुरवठा झालेला नव्हता. दरम्यान पालिकेने शहरात ५ एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. रविवारपासून केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा महोत्सव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या परिस्थितीत पालिकेकडून पूर्ण शहरातील ११५ वॉर्डांत १२१ लसीकरण बुथ तयार करून तेथे लसीकरण सुरू केले आहेत. नेहमीपेक्षा आता तेथे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी ७ हजार ३६७ जणांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. यात आणखी वेग वाढणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थिती राज्य सरकारकडून सोमवारी ३० हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. हा साठा चार दिवस पुरेल एवढा असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.