कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
“देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीप्रमाणे कराडजवळ महामार्गावर वाहनाच्या भीषण धडकेत गरोदर असलेली मादी माकड ठार झाले. एका अज्ञात वाहनाच्या अपघातात मादी माकड ठार झाले, मात्र त्याचे पोटातील पिल्लू जिवंत राहिले आहे. अपघातात माकडीनेचे पोट फुटले अन् नवजात पिल्लू रस्त्यावर पडले. यावेळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा यांनी तत्परता दाखवत पिल्लाला जीवदान दिले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत एक दुर्देवी घटना घडली. हॉटेल सेप्रॉन समोर कराड ते सातारा लेनवर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या गरोदर मादी माकडाला जोराची धडक दिली. यामध्ये मादी वानर जागीच ठार झाले. मात्र, मादीचे पोट फुटल्याने पोटातील पिल्लू बाहेर हायवेवर पडले होते.
याबाबतची खबर मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माकडाच्या पिल्लाची नाळ कापून पिलाला पेट्रोलिंग गाडी मधून पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेले. त्याच्यावर लगेच उपचार केल्याने पिल्लाला जीवदान मिळाले. अपघातात ठार झालेली मादी व जिवंत माकडाचे पिल्लू वनविभागाचे अधिकारी शीतल पाटील व रमेश जाधवर यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड यांनी मदत केली. हायवे हेल्पलाईनच्या कर्मचारी व दस्तगीर आगा यांनी तात्काळ दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.