हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अजित पवार गटाला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आज आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी हात मिळवणी केली आहे. म्हणजेच आता लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) निलेश लंके तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले आहे. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना, “मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत” असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके अजित पवारांची साथ सोडतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात आपण आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. यावेळी बोलताना, “पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. आता शरद पवारांचा मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार” असे भाष्य निलेश लंके यांनी केले. हे सांगत असताना निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, निलेश लंके हे दक्षिण नगरमधून निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना नगरमधून तिकीट देण्यात येऊ शकते. असे झाल्यास नगर मतदार संघात खासदार सुजय विखेविरुद्ध निलेश लंके अशी लढत पाहिला मिळेल. दुसऱ्या बाजूला, निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा इशारा सुनील तटकरेंनी दिला होता. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.