नवाब मालिकांना नियती माफ करणार नाही; निलेश राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली असून ते मुस्लिम आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांना नियती माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

एका ड्रग पार्टीमध्ये रेड पडली, सेलिब्रिटीचा पोर पकडला गेला, गुन्हा मान्य केला, ड्रग नेक्सस उघडणार होतं तेवढ्यात एक मंत्री ड्रग माफियाची बाजू घेऊ लागला आणि आज ते मॅटर ड्रग नेक्ससचं नसून ज्या अधिकाऱ्यांनी रेड मारली त्याच्या जातीवर आलंय. नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही असे ट्विट नीलेश राणे यांनी केलं आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वानखेडेंचा मित्र- मलिक

दरम्यान, मुंबई येथील क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे असा गंभीर दावा नवाब मलिक यांनी केला.