Wednesday, March 29, 2023

जगातील १०० प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन; फोर्ब्सच्या यादीमध्ये मिळवले ३४ वे स्थान

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र । जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल वुमनच्या यादीत त्यांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी असून सीतारामन यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे.

याच यादीत नुकताच टाइम मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ ल पुरस्काराची मानकरी ठरलेली अवघ्या सोळा वर्षाची ग्रेटा थनबर्ग हिचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. तसेच यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान मल्होत्रा या ५४ व्या क्रमांकावर असून त्या एचसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ८.९ अब्ज डॉलर्सची आहे. मजुमदार शॉ या ६५ व्या क्रमांकावर असून त्या स्वयंश्रीमंत महिलांमध्ये आघाडीवर आहेत. बायोकॉन या कंपनीची स्थापना त्यांनी १९७८ मध्ये केली होती. त्यांनी संशोधन व पायाभूत व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे. तर सीतारामन यांच्या खांद्यावर सध्या अवघड अश्या अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोदी सरकार-१ मध्ये त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली होती.