रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या उद्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळी आपल्या शैलीत उत्तर दिलं.
‘या वादळाची दाहकता सगळ्यांना समजली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी दौरे केले पाहिजेत. मी दुष्काळी भागातून येतो. फडणवीस विदर्भातून येतात, त्यामुळे त्यांचा आणि समुद्राचा संबंध नाही. फडणवीस येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, त्यांना इथली स्थिती समजेल,’ असं टोला शरद पवारांनी हाणला.
चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरांसह, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचं, शेतीचं अतिशय नुकसान झालं आहे. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करा, अशी मागणी पवारांनी केली आहे. बागांच्या नुकसानीसाठी मदत देताना पुढील ६ ते ७ वर्षांचा विचार करुन द्यावा लागेल. कारण हे पिक एका दिवसात उभं राहत नाही, यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलणार असल्याचंही पवार म्हणाले.
कोकणात मत्स्य व्यवसायाची स्थितीही बिकट आहे, कोरोनामुळे २ महिने व्यवसाय थांबला होता. आता वादळात बोटी, जाळी, इंजिनाचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत करायला हवी, त्याबाबतही राज्य सरकारशी बोलणार असून, या संकटातून यातून आपण बाहेर पडू, सरकार मदत करेल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in