हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद उफाळून आला आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरु असतानाच आज नितेश राणे यांनी पुन्हा एकदा जरांगेवर जहरी टीका करत हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणे साहेबानी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं असं म्हणत मनोज जरांगे हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. EWS मधून जेव्हा पोलीस भरती निघाली, तेव्हा ९० टक्के लोक हे मुस्लीम समाजाचे होते. त्यामुळे मराठा समाज आणि महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हा आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातोय. तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांची सेवा करताय याबाबत स्पष्टता येउदे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एका तरी मराठा तरुणाचा फायदा झाला का, याचा त्यांनी आम्हाला हिशोब द्या असं म्हणत नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं.
नितेश राणे पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे गोधडीत असताना नारायण राणे साहेबानी आरक्षण मिळवून दाखवले आहे. त्यामुळे तू राणे साहेबाना, प्रवीण दरेकरांना, आम्हाला आव्हान देऊ नकोस, तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते. तू आधी हे सांग की तू मराठ्यांचा आहेस की मुसलमानांचा आहेस? कारण तुझ्या दाढीवर आता आम्हाला संशय यायला लागला आहे, असा एकेरी उलेख करत नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर बोचरी टीका केली आहे.
संजय राऊतांवरही निशाणा –
दरम्यान, राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे फक्त शिवसैनिक नव्हते तर सर्वच पक्षाचे मराठा कार्यकर्त्ये होते अशी स्पष्टोक्ती खासदार संजय राऊत यांनी दिली होती, त्यावरूनही नितेश राणे यांनी टीका केली. आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत. हे फक्त राऊत आणि उद्धव ठाकरे करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांचा समाचार घेतला.