मुंबई | मागासवर्गीय आयोग सरकारने स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा झाल्यापासून ओबीसी समाज अस्वस्थ आहे. त्यातून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन समाजात अशी दरी निर्माण व्हावी, अशी काही यंत्रणा काम करीत आहे. त्यांचा तो उद्देश साध्य होणार नाही, याची काळजी ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी घ्यावी, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर ओबीसी नेत्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली असून मराठा समाज आपल्याच आरक्षणात समाविष्ट होईल, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यातून दोन समाजात दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी विधानसभेच्या कामगजा दरम्यान सभागृह तहकूब झाले तेव्हा नितेश राणे आणि माजी आमदार, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांची भेट झाली. तेव्हा नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन त्यांची भेट घेतली.
प्रकाश शेंडगे हे ओबीसी समाज घटकांच्या बाजूने आपली मते मांडत आहे. दोघांत झालेल्या चर्चेनंतर बोलताना नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसी समाज घटकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांनी आपला हक्का जपण्यासाठी नक्की प्रयत्न करावेत. पण दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. वक्तव्य करीत असताना कोणत्याही समजाविषयी तिरस्कार निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
कारण नेते हे समजदार असतात. आपली मते मांडून ते शांत राहू शकतात. मात्र ग्रामीण भागातील कार्यकर्ते संवेदनशील असतात. त्यांचा उद्रेक होऊ शकतो. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज बहुजन आहेत. बहुजन समाजात अशी फूट पडणे राज्याच्या, त्या त्या समाजाच्या आणि देशाच्या हिताचे नाही. दोन्ही समाजाच्या नेत्यांनी वक्तव्य जपून करावीत.
यापुढे जाऊन मी असे म्हणेल की, ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी एका व्यासपीठावरून येऊन तसे प्रयत्न करावेत. कारण या दोन समाजात तेढ निर्माण व्हावे, अशी इच्छा बाळगणारी काही मंडळी आहेत. किंबहुणा त्यांचा तसा प्रयत्न असू शकतो. तो उद्देश साध्य होणार नाही याची काळजी मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.