“शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार”; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज तोडणी तत्काळ बंद करावी या मागणीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केला. त्यांच्या सभात्यागानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” अशी घोषणा मंत्री राऊत यांनी विधानसभेत केली.

विरोधी भाजप नेत्यांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर वीज तोडणी व वीज बिल माफी या मुद्यावरून निशाणा साधण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी प्रश्नवरून हल्लाबोल केला. “काल झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी संदर्भात जे आश्वासन दिले तर त्यांना पूर्ण करता आलेले नाही. हे ठाकरेंचे सरकार आहे. हे सरकार कोडगे आहे, शेतकऱ्यांबाबत संवेदना या सरकारला राहीलेली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सभागृहात महत्वाची घोषणा केली. महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तूर्तास थांबवण्यात येणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली.

नेमके काय म्हणाले नितीन राऊत?

आज वीज तोडणीच्या कारणावरून विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर विधीमंडळाचे कामकाज तूर्तास स्थगित झाले होते. पाच ते दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, संबंधित खासदारांना विनंती केली आहे की, महावितरण कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन सर्व वीज ग्राहकांनी सर्वप्रकारच्या महावितरण कंपनीची वीज बिलं वेळेवर फेडावीत, या महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment