वंचित बहुजन आघाडीने ‘या’ कारणामुळे उमेदवारांच्या जाती जाहीर केल्या – डॉ. नितीश नवसागरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | मयुर डुमने

‘राजकारणापासून वंचित असलेल्या जातींना अनेक वर्षे राजकीय संधी नाकारली गेली हे प्रस्थापित राजकारण्यांना दाखविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवाराच्या जाती जाहीर केल्या’ असं मत विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीश नवसागरे यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शाखेने आयोजित केलेल्या ‘लोकशाही व जातीअंताची लढाई’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

‘भक्ती आणि व्यक्तिपूजा ही अध्यात्मामध्ये सुखकारक असते पण राजकारणामध्ये ती तुमचा विनाश करते म्हणून सध्याच्या काळात कोणाचा भक्त न होणं म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची साधी व्याख्या नवसागरे यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, फक्त पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम म्हणजे लोकशाही नाही तर प्रत्येक वेळी सत्तेला आणि विषम व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजे तर लोकशाही सक्षम होत जाणार आहे. लोकशाहीत आपण विवेकाने वागलं पाहिजे. राजकारण्यांना सर्वात जास्त प्रश्न विचारले पाहिजे जेणेकरून लोकशाही अधिक सक्षम होईल. सॉफ्टवेअर कंपनीत अनेक दलित मुलं आपल्या जाती दाखवत नाहीत. त्यासाठी ते आडनाव लावत नाहीत. जातीच अस्तित्व नाकारून जातीनिर्मूलन करता येणार नाही.

गुजरातमध्ये घोड्यावर दलित मुलगा स्वार झाला म्हणून त्याला मारून टाकण्यात आल. जात ही फक्त धारणा नाही तर समाजव्यवस्था आहे.महात्मा फुले यांचा आदर्श परिवार म्हणजे बाप हिंदू, आई मुस्लिम,मुलगी बौद्ध, मुलगा ख्रिश्चन हे सर्व गुण्यागोविंदाने कुटुंबात नांदत आहेत. ईश्वर या कल्पनेविषयी तसेच जीवनाच्या मूलभूत तत्वज्ञानाविषयी यांच्यात कितीही मतभेद असू द्या, तरीही ही लोक एकत्र नांदत आहेत. विरोधी मताचा सन्मान करणं हा लोकशाहीचा मूळ गाभा आहे. आज मात्र सरकारविरोधात मत मांडल्यास देशद्रोही,पाकिस्तानी ठरवलं जातंय.

Leave a Comment