Friday, June 2, 2023

आर्यन खान प्रकरणात खंडणीचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत तसेच अद्याप कोणताही अहवाल सादर केला नाही – Reports

मुंबई । देशातील प्रसिद्ध आर्यन खान ड्रग-क्रूझ प्रकरणात खंडणीचे पुरावे मिळालेले नाहीत. याप्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.’ मुंबई पोलिसांनी तपासासाठी SIT (विशेष तपास पथक) स्थापन करून सुमारे 20 जणांची चौकशी केली होती.

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. खरेतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर सेलने आरोप केला होता की त्याने शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांच्या मागणीबाबत केलेले फोन संभाषण ऐकले होते, त्यानंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले. वृत्तानुसार, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी केपी गोसावी, सॅम डिसूजा यांची या रकमेबाबत भेट घेतली होती. मात्र, तपास पुढे सरकला नाही.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,”टीम काही कागदपत्रांच्या प्रतीक्षेत आहे आणि अद्याप कोणताही तपास रिपोर्ट सादर केलेला नाही. येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक टीम देखील तयार केली आहे.”

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे प्रमुख म्हणून समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी मुदतवाढीची मागणी केलेली नाही. ड्रग्सचे प्रकरण NCB SIT कडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि आर्यन खानला या प्रकरणाच्या संदर्भात दर शुक्रवारी कार्यालयात नियमित हजेरी घेण्यापासून मोकळे करण्यात आले आहे.