हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांसोबत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य असल्याचे त्यांनी म्हंटल. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत त्यामुळे इथे आरक्षणाची गरजच नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यात जात येते कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी केला. (Raj Thackeray On Reservation)
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. यात जात येते कुठे? मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहे? तिथे आरक्षण आहे का?. नकिती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला.
राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला. ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
शरद पवारांवर टीका –
दरम्यान, मणिपूरमध्ये जे घडलं तशी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा निर्माण होते का? अशी भीती वाटतं आहे असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होते, त्याबाबत विचारला असता राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, असं राज ठाकरेंनी म्हंटल.