कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये स्व. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 व्हेंटीलेटर बेड बसविले असून कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता आज या 10 व्हेंटीलेटर बेड लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, जालिंदर पाटील, प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश टोमपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, डॉ.श्रीनिवास बर्गे, कोवीड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.सोहेल शिकलगार, समन्वयक अमर कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अलीकडच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे काहींचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून आपण या कोवीड केअर सेटंरमध्ये व्हेंटीलेटर बेड बसविण्याचा निर्णय घेतला. या 10 व्हेंटीलेटर बेडमुळे व योग्य औषधोपचारामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे.