हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात COvid-१९ या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. सर्वच देश आपापल्या पातळीवर एकमेकांच्या सहकार्याने याच्याशी लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संकटकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देशांना सोसावा लागतो आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने हातावर पोट असणारे लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. अविकसित आणि विकसनशील देशातील गरिबी, उपासमार वाढली आहेच पण येणाऱ्या काळात ती आणखी वाढण्याचा धोका आहे. अशा वेळी जगभरातून वेगवेगळ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. जगभरातून साधारण ५ ट्रिलियन डॉलर चे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने छोटे व्यावसायिक, महिला, बेरोजगार आणि अशा विविध घटकांसाठी उपाययोजनेची पॅकेजेस जाहीर झाली आहेत. जगातील प्रत्येक मुलाला जगण्याची समान संधी आहे. म्हणूनच या अशासंकटाच्या वेळी अगोदरच गरीब आणि असहाय असणाऱ्या कुटुंबांचा आणि त्यांच्या उपेक्षित मुलांचाही विचार करण्यात यावा अशी मागणी जगभरातील बालकांसाठी काम करणारे नोबेल पुरस्कार विजेते आणि नेते यांनी केली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातील ४०-६० दशलक्ष लोक २०२० मध्ये गरिबीच्या रेषेखाली आहेत. १० दशलक्ष असंघटित कामगार आधीच बेरोजगार झाले आहेत. शाळा बंद झाल्याने ३७० दशलक्ष बालके पोषण आहाराला मुकली असून उपासमारीला बळी पडली आहेत.
जर जगातील सर्व देशांनी एकत्रित येऊन जगभरातील उपेक्षित बालकांसाठी एकूण पॅकेजच्या २०% पॅकेज म्हणजेच १ ट्रिलियन डॉलर पॅकेज जाहीर केले तर त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी म्हंटले आहे. हे एक ट्रिलियन डॉलर यूएन आणि चॅरिटेबल संस्थांना मदत करतील ज्याच्या साहाय्याने कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील दोन वर्षाची कर्ज परतफेड रद्द करा आणि हे पैसे आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि शिक्षणासाठी द्या. असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण ही अशी महत्वपूर्ण पायरी आहे ज्याद्वारे सर्व प्रकारचा बहिष्कार संपवता येऊ शकतो. आणि याद्वारे उपेक्षित मुलांचे भविष्य बदलता येऊ शकते. बालकामगारांसाठीच्या लढ्यातील महत्वपूर्ण सामाजिक सुरक्षा जाळी साठी देखील निधी शिल्लक ठेवता येईल. १० दशलक्ष मुलांचे जीव सुरक्षित होतील. covid -१९ च्या शोकांतिकेतील मानवाकडून आलेला एक सकारात्मक प्रतिसाद असेल असे आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक वित्तपुरवठा संस्थांना संसाधने उपलब्ध करून देण्याचे आवाहन याद्वारे सर्व पुरस्कार विजेते तसेच नैतिक नेते यांनी केले आहे.
जगभरातील सर्व असुरक्षित मुलांसाठीच्या या लढ्यात जगभरातील बालकांसाठी काम करणारे सामाजिक नेते समाविष्ट आहेत. २०१४ सालचे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एका व्हिडिओद्वारे #Everychildmatter या हॅशटॅगखाली ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटकाळात या उपेक्षित बालकांकडेही लक्ष देऊन त्यांच्या असुरक्षित वर्तमानाला एका सुरक्षित भविष्यात परिवर्तित करण्याची ही मोहीम आहे.