कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शासनाने उत्सव काळात चार दिवस बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. गणेशोत्सव काळात रस्त्यावर होणारी गर्दी, वाहतुकीची समस्या याबद्दल सूचना देण्यात येतील. शहरातील मंडळात नियमांचे उल्लघंन होणार नाही, यासाठी मंडळांनीही दक्षता घ्यावी. मंडळांचे परवान्यासाठीचे अर्ज ऑनलाइनही स्वीकारले जातील. तसेच ध्वनिपेक्षावरील आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल. त्यासाठी पोलिस आवाज सेट करून देतील, असे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.
कराड येथे कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी हाॅलमध्ये आयोजित गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
शिवसेनेचे दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद यांनी कोल्हापूर नाका, मार्केट यार्ड परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याकडे लक्ष वेधले. माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी केवळ गणेशोत्सव व शिवजयंतीवेळी आवाजाची मर्यादा पाळावी, यासाठी प्रशासन आग्रही भूमिका घेते. वर्षभर विविध उत्सव व सण असतात, त्यावेळी अशा पद्धतीने पोलिसांनी भूमिका घ्यावी अशी मागणी करत असे होत नसल्याने विनाकारण गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व प्रशासनाबाबत गैरसमज निर्माण होतात, याकडे लक्ष वेधले. स्मिता हुलवान यांनी गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांकडून लावल्या जाणार्या बॅनरवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करत एका मंडळाने एकच बॅनर लावावा, याबाबतची सूचना करण्याची विनंती केली.
माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी पाच दिवसानंतर गणेशोत्सवातील देखाव्यांना प्रारंभ होतो. रात्री 9 नंतर लोक देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. रात्री दहा वाजता देखावे बंद करावे लागतात. त्यामुळे ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली. त्यानंतर रूचेश जयवंशी यांनी मंडळांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली. आपल्या अधिकार कक्षेत असल्यास देखाव्यांना वेळ वाढवता येते का? याबाबतही योग्य तो निर्णय घेऊ असे सांगत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. तर पोलिस अधिक्षकांकडून दरवर्षीप्रमाणे कराडकरांनी पोलिसांसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत सहकार्याची ग्वाही दिली.