महापालिकेने बजावल्या शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने अशा 12 रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी मारामार सुरू होती. या परिस्थितीचा फायदा अनेक खासगी रुग्णालयांनी घेतला. ठरावीक रक्कम जमा केल्यानंतर रुग्णांना प्रवेश दिला जात होता. असे प्रकार वाढल्याने अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या. त्यानुसार राज्य शासनाने रुग्णांच्या नातेवाइकांकडून किती बिल घ्यावे, याचे दरपत्रक जाहीर केले होते. त्यानंतरही काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय झाला.

त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्या रुग्णालयांनी जास्तीचे पैसे आकारले त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे परत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र या पत्राला देखील रुग्णालयांनी जुमानले नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाईसाठी महापालिकेकडे यादी सादर करण्यात आली आहे. महापालिकेने संबंधित 12 रुग्णालयांना नोटीस दिल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.