भारतात रेल्वे म्हणजे सामान्य माणसाला परवडणारे सार्वजनिक वाहन आहे. त्यामुळे देशभरात लाखो लोक रोज रेल्वे सुविधेचा लाभ घेत आहेत. अशातच सण , उत्सव , यात्रा काळात गर्दी पाहता जादा गाड्या सोडण्यात येतात. पण तरीही रेल्वेची गर्दी काही कमी होत नाही. देशात सर्वात मोठा कुंभमेळा सुरु आहे, याकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. मात्र रेल्वेच्या गर्दीत ट्रेन सुटल्यामुळे तब्बल ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याबाबतची नोटीस रेल्वे प्रशासनाला एका प्रवाशाने दिली आहे.
एक वकीलाने रेल्वेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला नोटीस पाठवत ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.मुजफ्फरपूर जंक्शनवर स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेसचा दरवाजा बंद असल्याने ट्रेन चुकल्यानंतर वकील सुबोध कुमार झा यांनी हा कायदेशीर नोटिस पाठवला आहे.
नेमके काय घडले ?
गायघाट, सुबास गावचे रहिवासी वकील राजन झा आपल्या कुटुंबासह प्रयागराज महाकुंभसाठी प्रवास करत होते. त्यांची स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेसच्या B-2 बोगीमध्ये तीन बर्थ कन्फर्म होत्या. मुजफ्फरपूर जंक्शनवर ट्रेन थांबली, पण गेट बंद होता आणि गर्दीमुळे ते ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत. त्यांना पैसे परतही मिळाले नाहीत, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. ५० लाख रुपयांची भरपाई मागितली असून, १५ दिवसांत उत्तर न मिळाल्यास ते कोर्टात जाणार आहेत.
महाकुंभ यात्रेदरम्यान रेल्वे अपघात, प्रवाशाचा मृत्यू
तर दुसऱ्या एका घटनेत प्रयागराज महाकुंभ यात्रेत स्नान करून परतताना ट्रेनमधून पडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव यशवंत पाठक असून ते बरौनी प्रखंडातील पपरौर पंचायतच्या वार्ड क्र. ३ चे रहिवासी होते. मुगलसराय रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये हाहाकार उडाला. पंचायतचे माजी मुखिया अरविंद कुमार राय यांनी सांगितले की, यशवंत पाठक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोबाइल दुकान चालवत होते. त्यांच्यामागे एक लहान मूल आहे, आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.