औरंगाबाद | अनलॉकमध्ये पहिल्या टप्प्यात शहराचा समावेश झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहे. हा पहिला टप्पा टिकवून ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने पुढील आठवड्यात शहरातील व्यापाऱ्यांसह हॉटेल चालकांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहर पूर्णता अनलॉक झाले आहे. यातील पहिला टप्पा सांभाळण्याची मोठी जबाबदारी शहरवासीयांवर आहे. यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे कोरोना संपलेला नाही. कोरोनाची सुपर स्प्रेडर ठिकाणी आणि व्यक्ती यांच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. याकरिता शहरातील व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी हॉटेल चालक व कर्मचारी यांचे लसीकरण करण्याची तयारी महापालिकेने आता सुरू केली आहे. त्याकरिता कोविन ॲपमध्ये स्वतंत्र साईड सुरू करून त्यामध्ये नोंदणी केली जाणार आहे.
व्यापारी चाचणीसाठी चार केंद्रे
व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी चार केंद्रे सुरू केली आहेत.सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी चाचण्या केल्या जातील. व्यापाऱ्यांसाठी बायजीपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, संत तुकाराम नाट्यगृह सिडको एन-5, एमआयटी कॉलेज इमारत क्रमांक-2 या केंद्रावर चाचणी केली जाणार आहे.