औरंगाबाद – आज एमएमआयचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपला दौरा करण्यापूर्वी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले असून त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. औरंगबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाना साधला आहे. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान अकबरूद्दीन ओवैसी यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण हेसुद्धा उपस्थित होते.
“ज्या महाराष्ट्रातील औरंगाबादेत संभाजी महाराजांचा छळ करण्यात आला त्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेण्याची गरज काय होती? असा सवाल करत त्यांनी दोन समाजात तणाव निर्माण करण्यासाठी जलील आणि ओवैसी प्रयत्न करत आहेत, वातावरण खराब करत आहेत. दर्ग्यात जाण्यासाठी आम्हाला हरकत नाही पण तुम्ही कबरीवर जाऊन चूक केली आहे. त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.” असं खैरे म्हणाले.
“परवा आम्ही तिथे संभाजी महाराजांची तिथे जन्मदिन साजरा केला आणि त्या दृष्ट औरंगजेबाचं नाव त्यांना कशाला पाहिजे?” असा सवाल त्यांनी केला आहे. “मुद्दाम वातावरण खराब करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांना जर शाळेचं उद्धाटन करायचं असेल तर करा पण, जिथे कोणताच मुस्लीम जात नाही तिथे हे का जातात? जायलाचं नाही पाहिजे. हिंदूंच्या शेपटीवर पाय देण्याचं काम ते करत आहेत.” असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
“औरंगाबादचे चुकून निवडून आलेले खासदार त्यांना तिथे घेऊन गेले. ते जनतेचं काम करत नाहीत म्हणून मुस्लिमसुद्धा त्यांच्यापासून दूर गेलेला आहे.” असं ते बोलताना म्हणाले आहेत. “आता पहा काय होतंय ते, आम्ही सोडणार नाही, आम्ही हिंदुत्वासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत आणि इथे असे प्रकार होत असतील तर याला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत.” असं ते म्हणाले आहेत.