हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत आणि अर्जेंटीना यांच्यात आज सेमी फायनल मॅच झाली आणि हि मॅच अतिशय चुरशीची लढत होती असे म्हणायला हरकत नाही. भारताने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटात दमदार गोल करत आघाडी केली होती. त्यानंतर अर्जेंटीनाने एक गोल केला आणि मग सामना अधिकच रंगला. ही आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि विजय साकारला. या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दमदार कामगिरी केली. पण प्रत्येक दिवस आपला नसतो म्हणत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र या पराभवानंतरही भारतीय संघाला कांस्यपदक पटकावण्याची संधी नक्कीच आहे. त्यामुळे होप फॉर बेस्ट.
या सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या सुरवातीला गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. यावेळी भारताची कर्णधार राणी रामपालने पेनेल्टी कॉर्नर घेतला होता. त्यावर गुरजित कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. भारताचा गोल झाल्यावर अर्जेंटीनाने पूर्ण ताकदीनिशी भारतावर जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताने अर्जेंटीनाला चांगलेच थोपवून धरले होते आणि पहिल्या सत्रात १-०ने आघाडी कायम ठेवली होती.
तर, सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटीनाला वरचढ होण्याची संधी मिळाली. या सामन्याच्या १७ व्या मिनिटाला अर्जेंटीनाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर २१व्या मिनिटाला भारताला पुन्हा एक गोल करण्याची संधी मिळाली होती. पण यावेळी भारताला हि संधी मिळविता आली नाही. पण सामन्याचे २७ वे मिनिट अत्यंत उत्सुकता ताणणारे ठरले. कारण या एका मिनिटात पंचांनी ३ पेनेल्टी कॉर्नर दिले होते. यामध्ये भारताला २ तर अर्जेंटीनाला १ कॉर्नर मिळाला होता. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आपल्या बाजूने चांगली लढत दिली. त्यामुळे सामन्याच्या मध्यापर्यंत हा सामना १-१ असाच बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या सत्रात काय घडेल याची उत्सुकता फार होती. अखेर, तिसऱ्या सत्रात अर्जेंटीनाने ३६ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ४०व्या मिनिटाला भारताच्या नेहाला ग्रीन कार्ड मिळाले व ती सामन्यातून २ मिनिटांसाठी बाहेर गेली.
चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं आघाडी घेण्यासाठी अर्जेन्टिनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सामना संपण्यास शेवटचा १० मिनिटांचा कालावधी असताना भारताला बरोबरीचा गोल करण्यासाठी पेनल्टी कॉर्नर मिळाला असतानाही अर्जेंटिनाच्या गोली मारियानं हा डाव हाणून पाडला. पुढे अर्जेंटिना सुरु लढतीवर ताबा ठेऊन सावध खेळ खेळात होती आणि भारताला खेळावर नियंत्रण देत नव्हती. परिणामी भारतीय संघाला हार पत्करावी लागली