औरंगाबाद | आतापर्यंत आपल्याला बस चालक म्हंटले की पुरूष बसचालक सर्वत्र दिसून येतात. मात्र, आता लवकरच आपल्याला महिला बस चालवताना दिसणार आहेत. बऱ्याच बसमध्ये महिला कंडक्टर असतात परंतु आता बस चालक म्हणून महिला रस्त्यावर उतरणार आहेत. सध्या औरंगाबादेत महिला बस चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन स्टेरिंग असलेल्या खास बसचा वापर करून प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या औरंगाबाद आणि नाशिकसाठी बस चालक पदासाठी 32 नागरिकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील 6 महिलांचा समावेश असून या महिलांना शंभर दिवसांचे वर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे आता 200 दिवसांचे बस चालवण्याचे प्रशिक्षण देखील सुरू आहे. या महिला एसटीचालकांना पाहून रस्त्यावरील अन्य वाहनचालकांसह नागरिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.
या महिलांना बस चालवण्याचे प्रशिक्षण एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक अनंत पवार आणि 25 वर्षे एसटी चालविण्याचा अनुभव असलेले चालक एकनाथ गायकवाड हे देत आहेत. महिला आत्मविश्वासाने सर्व काही करू शकतात. हे या बस चालक महिलांनी दाखवून दिले आहे. या प्रशिक्षणाचे बरेच टप्पे बाकी आहेत. टप्पे पार केल्यानंतरच महिला प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.