औरंगाबाद – शहरातील विविध भागातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद ट्री सेन्सस म्हणजेज एटीटी हे मोबाइल प विकसित केले जात आहे. दिवाळीनंतर लगेचच या झाडांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. पुढील 26 जानेवारीपर्यंत ही गणना पूर्ण केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादी प्रकल्पात लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विशेष मोबाइल अॅप्लीकेशन देण्यात आले होते. या अॅप्लिकेशन्सचा जिओ टॅगिंग डाटा अजूनही उपलब्ध आहे. म्हणून याच धर्तीवर वृक्षगणना करण्यासाठी एक मोबाइल अॅप्लीकेशन विकसित करावे. या अॅपच्या माध्यमातून तसेच लोक सहभागातून वृक्षगणना करून घ्यावी, असे निर्देश महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले. गुरुवारी महापालिका, स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद फर्स्ट यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पांडेय यांनी हा मुद्दा मांडला.
तसेच शहरात मुंबई दर्शन बसच्या धर्तीवर औरंगाबाद दर्शन बस सेवा सुरु करण्याचाही विचार महापालिका प्रशासनाचा आहे. त्यासाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली. या सेवेसाठी स्मार्ट सिटीची मदत घेतली जाणार आहे. पर्यटनाला चालवना देण्यासाठी महापालिकेत पर्यटन विभाग आहे. या विभागाची जबाबदारी उपायुक्त सौरभ जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उपायुक्त जोशी यांनी आता पर्यटन विभागाच्या माध्यमातून कोण कोणते उपक्रम राबवता येतील या अनुषंगाने चाचपणी सुरु केली आहे. मुंबई दर्शनच्या सुविधेप्रमाणे औरंगाबादमधील प्रेक्षणीय स्थळांसाठीही अशी सेवा करता येईल, असे प्रयत्न सुरु आहेत.