बट्याबोळ! फोनवर बोलत बोलत नर्सने एकाच महिलेला दिली दोन वेळा कोरोना लस, पुढे झाले असे…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतलीआहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र कानपूरमधील देहात मधून लसीकरणाच्या वेळी घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

एका नर्सने एका महिलेला आपल्याच नादात गुंग असताना दोन वेळा कोरोना लस टोचली. करोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर साधारण पंधरा दिवसांच्या अंतराने कोरोना लसीचा दुसरा डोस दिला जातो. मात्र कानपूरमध्ये एका नर्सचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

कानपूरमध्ये देहातच्या मदौली पीएचसी मध्ये कोरोनाची लस दिली जात आहे. कमलेश देवी नावाची महिला या ठिकाणी लस घेण्यासाठी गेली. याच दरम्यान फोन मध्ये व्यस्त असणार्‍या नर्स ने एकाच महिलेला दोन वेळा कोरोना लस दिली. या महिलेने तक्रार केल्यानंतर नर्स ने आपली चूक मान्य केली. मात्र महिलेच्या कुटुंबियांनी या वेळी एकच गोंधळ घातला.

याबाबत बोलताना कमलेश देवी यांनी सांगितले की, नर्स मोबाईल वरून कोणाशी तरी बोलत होती. तिने फोनवर बोलत बोलतच मला लस दिली. मी तिथेच बसून राहिले. फोनवर बोलत असताना ती हे विसरली की तीने या आधी मला लस दिली आहे. तिने मला पुन्हा एकदा लस दिली. यानंतर मी तिला विचारणा केली की, दोन वेळा लस दिली जाते का? तेव्हा तिने नाही असं उत्तर दिले. त्यानंतर मी तिला म्हणाले की तुम्ही मला दोन वेळा लस दिली. तेव्हा ती माझ्यावरच भडकली. तुम्ही उठून का गेला नाहीत असा प्रश्न तिने केला. यानंतर कमलेश देवी ने सांगितलं की मला माहिती नव्हते की एकच लस घ्यायची आहे.

कुटुंबियांचा एकच गोंधळ

या घटनेनंतर कमलेश देवी यांचा हात भरपूर सुजला या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळतात कुटुंबीयांनी या ठिकाणी एकच गोंधळ केला. त्यावेळी या ठिकाणी अधिकारी दाखल झाले त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. कानपुर देहात चे सीएमओ राजेश कुमार यांनी फोनवरून माहिती दिली कि या प्रकरणाची डीएम यांनी गंभीर दखल घेत त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान त्या महिलेची प्रकृती ठीक असून लस देण्यात आली होती तिथे हात सुजला आहे अशी माहिती महिलेच्या मुलाने दिली आहे.

घटनेच्या चौकशीचे आदेश

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम बनवण्यात आली असून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल समोर आल्यानंतर याबाबत कठोर कारवाई केली जाईल. हा अत्यंत मोठा हलगर्जीपणा असून यामुळे मोठी दुर्घटना ही घडू शकते असं सी एम ओ राजेश कुमार यांनी म्हटले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like