कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणार्या एका परिचारिकेचा आज कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला.मेंदूला ऑक्सीजन कमी पडत असल्याने आज त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले. ज्योती राक्षे (वय 43) असे मृत्यू झालेल्या परिचारिकेचा नाव असून त्यांच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध नाही.
सदर परिचारिका सातारा जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात कार्यरत होत्या. मेंदूच्या आजारामुळे त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर अधिक उपचारसाठी त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ४ दिवस उपचार चालू होता. पूर्वी औन्ध (पुणे ) येथे अधिपरीचारिका म्हणून कार्यरत होत्या. गेल्याच वर्षी सातारा जिल्हा रुग्णालयात बदली झाली होती. त्यांनी दरम्यानच्या काळात हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाचा डोस घेतला होता. त्यानंतर प्रकृती खालावली होती. चिंताजनक परिस्थिती झाल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, त्यांच्या मेंदूला सूज आल्याने मृत्यू झाल्याचे संशय वैद्यकीय यंत्रणेने वर्तवला आहे. त्यांच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध नसून मेंदूला सूज आल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे.