Thursday, March 23, 2023

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा २००६) कायदा लागू करण्यात आला आहे. म्हणूनच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या तसेच वैद्यकीय सेवेवर हजर नसलेल्या डॉक्टर आणि नर्सविरोधात या कायद्याच्या आधारावर प्रशासनाला कारवाईचे अधिकार मिळाले आहेत.

सध्या पुण्यातील ससून, आरोग्य खात्याचे औंध, महापालिकेचे डॉ नायडू रुग्णालय तसेच इतर काही रुग्णालयात कोरोना उपचार सुरु आहेत. पण दररोज पुण्यामध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. म्हणून पुण्यातील खाजगी रुग्णालयातील ८०% बेड शासनाकडून आरक्षित केले जाणार आहेत. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. ज्या रुग्णालयात ३० ते ५०० बेड आहेत. अशा रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे अशा रुग्णालयात काम करणारी डॉक्टर आणि नर्स ना कोरोना उपचार करावे लागणार आहेत. ते त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

रुग्णालयात जे डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी काम करत आहेत त्यांनी अत्यावश्यक सेवा देणे बंधनकारक आहे. जे काम करण्यास नकार देतील आणि कामावर येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे या कायद्यांतर्गत आता वैद्यकीय सेवा बजावताना ना कोणी आपल्या कामात कसूर करू शकेल ना आपली जबाबदारी टाळू शकेल. ही  माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.