टीम हॅलो महाराष्ट्र । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुश गोलंदाज अशी ओळख असलेल्या बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
बापू नाडकर्णींच्या नावे असाही एक विश्वविक्रम
बापू नाडकर्णींना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कंजुश गोलंदाज म्हणतं. कसोटी सामन्यात सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी चेन्नईच्या मैदानावर इग्लंडविरुद्ध रचला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला. बापूंच्या गोलंदाजी सरावाचीही तेव्हा नेहमी चर्चा असायची. नेटमध्ये सराव करताना नाणे ठेवून ते सराव करायचे. नाण्याचा अचूक वेध घेऊन मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यातूनच त्यांच्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांची फिरकी घेतली.