मिरजेत कोरोना रूग्णालयात महिलेची गळफास घेवून आत्महत्या

सांगली | मिरज येथील शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन कुंभार (वय- 35 सुभाषनगर, मिरज) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुमन कुंभार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेेले काही दिवस तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या कोरोनातून बऱ्याही झाल्या होत्या. त्यांची ऑक्सिजन पातळी चांगली झाली होती.

परंतु आज सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी सुमन कुंभार यांनी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कोरोनावर मात केल्यानंतर ही सुमन यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.