रस्त्यावरून वेगाने जाताना अचानक मारुतीच्या गाडीने घेतला पेट; ‘हे’ कारण आलं समोर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील अंजनी गावच्या हद्दीत सावळज रस्त्यावर शॉर्टसर्किटने आग लागून ओमनी कार जळून खाक झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही.

अंजनी गावाचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील हे भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला विक्री नंतर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जवळच असणाऱ्या सावळज गावातील पेट्रोल पंपावर गेले.

सायंकाळी ६ च्या दरम्यान माघारी येताना अंजनी गावाजवळच राजेंद्र पाटील यांच्या बागेजवळ गाडीत आगीच्या ठिणग्या दिसु लागल्या. गाडी गरम होवून वायर जळाल्याचा वास येवू लागला. त्यामुळे विनायक पवार गाडीच्या बाहेर आले. क्षणार्धातच गाडीने पेट घेतला. गाडी रस्त्याच्या मधोमध पेटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

सदर घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी घटनास्थळी झाली होती. रस्त्यालगत असणाऱ्या बागेला गाडीच्या आगीच्या झळा बसल्यामुळे नवीनच फुटलेल्या द्राक्षवेलींचेही नुकसान झाले आहे. सदर घटनेची अद्याप पोलिसात नोंद झालेली नाही.