उस्मानाबाद प्रतिनिधी । कळंब तालुक्यामध्ये भाजपला कमी समजलं जातं. ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्यातून भाजपा संपवण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावरील या रागामुळंच मी ओमराजेंवर हा हल्ला केला असा आरोप ओमराजेंवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेने केला आहे. सोबतच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.
महायुतीचे विधानसभा उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार ओमराजे गावात आले असताना अजिंक्य टेकाळेने हस्तांदोलन करताना अचानकपणे ओमराजेंवर चाकू हल्ला केला होता. यामध्ये ओमराजेंचं घड्याळ आडवं आल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. घटनास्थळावरून अजिंक्य लगेच पसार झाला होता. मात्र पोलीसांनी त्याला त्याच्या घरी जाऊन अटक केली.
दरम्यान, अजिंक्य हा भाजपाच्या आयटी सेलचा कळंब तालुकाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली होती. ओमराजेंनी भाजपविरोधी काही वक्तव्य केल्याने त्यानं आक्रमक पाऊलं उचलल्याची गावात चर्चाही होत होती. त्यातच त्याने त्याचा फेसबुकवरून अशा प्रकारच्या पोस्टही टाकल्या होत्या. मात्र, आता अजिंक्यने ओमराजे जिल्हयात भाजप संपवत असल्याच्या रागातूनच हल्ला केल्याचे कबुल केले आहे. दरम्यान, आज ओमराजेंच्या हल्ल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद भाजपकडून बंदची हाक देण्यात आली आहे.