औरंगाबाद – पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून औरंगाबादेत शूर्पणखा वृत्तीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. ज्या प्रमाणे विजया दशमीच्या दिवशी परंपरे नुसार महापंडित रावणाच्या प्रतिमेचे दहन करून वाईट वृत्तीचे दहन होवो अशी प्रार्थना केली जाते. रावण एक पुरुष असून रावणाची प्रतिमा तयार करून जाळल्याने जर पुरुषांची वाईट वृत्ती जळते तर नक्कीच महिलांमधील वाईट वृत्ती जळून जाणे देखील तितकेच गरजेचे आहे, असा युक्तीवाद पत्नीपीडित संघटनेच्या वतीने करण्यात आला. या वेळी अध्यक्ष भारत फुलारे, वैभव घोळवे, पांडुरंग गांडूळे, रामेश्वर नवले, ऍड. गणेश डहाळे, ऍड. दहिफळे, चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, संजय भांड आदी उपस्थित होते.
पुरुष पीडित संघटनेच्या मते, आज आपण 21 साव्या शतकात जगत आहोत व ज्या प्रमाणे महिलांवर अन्याय होतात त्या प्रमाणे पुरुषांवर देखील अन्याय अत्याचार होतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे . महिलांवर अत्याचार ,अन्याय झाल्यास त्याचा चोहो बाजूने उदो उदो केल्या जातो , महिलांसाठी महिला आयोग आहे ,महिलांवर अत्याचार झाल्यास बहुतांश पोलीस देखील केवळ महिलांची बाजू ऐकून घेतात, महिलांच्या बाजूने कायदे आहे ,सरकार आहे ! न्याय व्यवस्था देखील केवळ महिला धार्जिणी बनत चालली आहे, असा आरोप पुरुष पीडित संघटनांनी केला.
ज्या वेळी पुरुषांवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा तो एक अनाथाप्रमाणे भटकतो ,पोलीस ठाण्यात मदत मागायला गेल्यास पोलिसांकडून पुरुषांची अवहेलना केली जाते ,थट्टा मस्करी केली जाते ,समाज ऐकून घेत नाही. पुरुषांच्या बाजूने कायदे नाही , न्याय व्यवस्था योग्य रीतीने ऐकून घेत नाही, त्यामुळे बहुतांश पुरुष हे आत्महत्येचा मार्ग स्वीकारताने दिसतात, असा आरोप संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. NCRB अहवालानुसार पुरुष आत्महत्त्या भरमसाठ वाढत चालल्या आहे. स्त्री व पुरुष हे दोन्ही घटक मजबूत असणे गरचेचे असताना कायदे केवळ महिलांच्या बाजूने बनवल्या जातात . त्यामुळे पुरुष हतबल होत चालला आहे, अशी व्यथा पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या सदस्यांनी मांडली.
पत्नीपीडितांच्या मागण्या-
– पुरुषांसाठी वेगळा पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे.
– प्रत्येक पोलीस ठाणेत पुरुष सुरक्षा समिती स्थापन झाली पाहिजे.
– पुरुषांच्या रक्षणासाठी पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनले पाहिजे,
– घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू झाला पाहिजे.
– पोलिसांना पुरुषांची बाजू योग्य रीतीने ऐकून घेण्याची सद्बुद्धी दिली पाहिजे
या मागण्या पत्नीपीडित पुरुष संघटनेने मांडल्या आहेत.