Friday, June 2, 2023

जिल्हयात डेंग्यू, चिकनगुनीयाने काढले डोके वर

औरंगाबाद : जिल्हयात पावसाळ्याला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात डेंग्यू आणि चिकनगुनीया या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात एकूण १३ डेंग्यूचे तर चिकनगुनीयचे १६ रुग्ण आढळले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात जावून विशेष जनजागृती करण्याचे काम सुरू असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या रक्ताचे नमुने आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. २९ हजार ५७७ रक्ताचे नमुने जून महिन्यात घेतले आहे. पण यात एकही मलेरियाचा रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान एप्रिल ते जुलै महिन्यात ६० रक्ताचे नमुने घेतले असून यात १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात चिकणगुनीयाचे २७ नमुन्यांपैकी १६ नमुने पॉसिटीव्ह आले आहे. खाजगी रुग्णालयात ५० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे डॉ.धानोरकर यांनी सांगितले.

रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी पाणी साचू देवू नका, स्वच्छता राखा, आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळावा, अंगभर कपडे घालावेत, मच्छरदाणीचा वापर करावा, या प्रकारचे अनेक आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासोबतच पाण्याच्या टाक्यात डासांच्या अळया मारण्यासाठी अबेट लिक्विड टाकने, धूर फवारणी करणे, गप्पी मासे टाकण्यात येत आहेत.