कराड डीवायएसपीच्या पथकाकडून दीड किलो गांजा जप्त

कराड | तालुक्यातील शिरवडे गावच्या हद्दीत पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात सुमारे दीड किलो गांजा जप्त केला. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. त्याबाबत तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अन्वर बालेखान मुल्ला (वय-45, रा. शिरवडे, ता. कराड) असे गांजाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत हवालदार सागर बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात शिरवडेच्या हद्दीत गांजा विक्री असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस उपअधीक्षक पाटील यांना त्यांच्या पथकासह छापा टाकला.

छाप्यात एक हजार 418 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला आहे. कारवाईत पोलिसांनी एकावर तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जे. डी. पाटील तपास करीत आहेत.