महामार्गावरील उरमोडी पूलावरील अपघातात एक ठार

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या मालट्रक व दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र महिपती जाधव (वय- 40, रा. लिंबाचीवाडी, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाधव हे दुचाकीवरून नागठाण्याहून सातारा बाजूकडे निघाले होते. येथील उरमोडी नदी पुलावर त्यांची दुचाकी (क्रमांक MH- 11-AV- 9816) आली असता पाठीमागून आलेल्या मालट्रकने धडक दिली. त्यात जाधव हे महामार्गावर पडले. त्याचवेळी मालट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दस्तगीर आगा, बोरगाव पोलिस ठाण्याचे हवालदार विजय देसाई, प्रकाश वाघ व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.