कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील विंग येथे भरधाव कार पलटी होत भिंतीला धडक होऊन झालेल्या अपघातात आगाशिवनगर येथील एक युवक ठार तर तीन युवक गभीर जखमी झाले आहेत. कराड-ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा- विंग नजीक शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अमर पंजाबराव कचरे (वय- 32 रा. गणेश कॉलनी आगाशिवनगर,मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जयदीप शांताराम जाधव (वय 24), निखिल सचिन कालेकर (वय 22), धैर्यशील प्रकाश कदम-पाटील (वय 25, सर्व रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड ) अशी आपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर येथील चार युवक कारमधून शुक्रवारी रात्री ढेबेवाडीच्या दिशेने जात होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास कार कणसेमळा, विंगच्या हद्दीत धोकादायक वळणावर आली असता कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. पलटी घेत कार रस्त्यालगतच्या भिंतीला धडकली. या अपघातात चारही युवक गंभीर जखमी अवस्थेत कारमध्येच अडकून पडले होते.
आपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल खाडे यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जवळच वास्तव्यास असलेले चचेगाव येथील ग्रामस्थानी अपघातस्थळी धाव घेतली. अनेक प्रयत्न करूनही कारमधून युवकांना काढण्यात अपयश येत होते. शेवटी जखमींचा जीव वाचवण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी कारची दरवाजे मोडून जखमींना रूग्णालयात पाठवले असता अमर कचरे याचे उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.