कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सध्या खुनाची मालिका सुरू आहे. शहरात शनिवारी महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना ताजी असताना तालुक्यात रात्री धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा प्रकारच्या घटनानांमुळे पुन्हा एकदा कराड तालुका हादरला आहे.
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कराड तालुक्यातील करवडी गावच्या हद्दीत वाघेरी फाट्यानजीक चौघांनी एकाच्या डोळ्यात चटणी टाकून त्यास लाकडी दांडक्याने व तलवारीने वार करून निघृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची नवनाथ रामचंद्र पवार (वय 36, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
रमेश रामचंद्र पवार (वय 40 रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर दिपक शरद इंगळे, संदिप सुभाष इंगळे व अनोळखी दोघेजण नावे समजू शकली नाहीत असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी नवनाथ व त्याचा भाऊ मयत रमेश हे दोघेजण भाजीपाला विक्रीचा फिरून व्यवसाय करीत होते. दिपक इंगळे हा त्यांच्याच गावात राहत असून गेल्या 10 ते 15 दिवसापासून त्याची पत्नी व रमेश पवार यांचेत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून दिपक व रमेश यांच्यात दोन दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता. शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी याचे बोलेरो गाडीतून भाजीपाला आणण्यासाठी कराड मार्केट येथे गेला. त्यावेळी त्याचेसोबत गावातील गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार असे होते.
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भाजीपाला खरेदी करून आर्वी येथे येण्यासाठी निघाले असता कराड-पुसेसावळी मार्गे जात असताना वाघेरी फाट्यानजीक पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीने ओव्हरटेक करून बोलेरो गाडीच्या पुढे गाडी आडवी मारून दिपक इंगळे, संदिप इंगळे व अनोळखी दोघांनी रमेश यास गाडीतून बाहेर ओढून पिशवीतून आणलेली मिरची पुड रमेशच्या डोळ्यात टाकून दिपकने तवेरा गाडीतून आणलेल्या तलवार सारख्या हत्यार्याने रमेशवर वार केले. त्याचबरोबर संदिप व अन्य दोघांनी रमेश यास लाकडी दांडक्याने मारहाण केली यात रमेशचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी पोबारा केला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी रमेशचा भाऊ नवनाथ पवार याने कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.