कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात गतवर्षी प्रमाणे यावर्षीही सलग दुसऱ्या वर्षी ‘एक नगरपरिषद एक गणपती’ या उपक्रमांतर्गत शहरात नगरपरिषद कार्यालयात एकच सार्वजनिक गणपती बसवून उत्सव साजरा केला जाणार आहे. पोलिस नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासन, गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नगरिकांच्या उपस्थितीत गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्षा सौ. निलम येडगे व डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकामसभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती शांत चांदे, नगरपरिषदेचे विरोधी क्षनेते अजित थोरात, नगरसेवक नागर जाधव, किशोर येडगे, गितांजली पाटील, भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष राजू मुल्ला, शिवसेनेचे कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशिद, जयंत कुराडे, दादा शिंगण आदीसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बी. आर. पाटील म्हणाले, एक नगरपरिषद एक गणपती हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय सर्वांच्या भल्यासाठी घेतला जात आहे. त्याला सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी डॉ. रणजित पाटील, राजेंद्र यादव, अजित थोरात, जयंत कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानदेव सांळुखे यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्षा निलम येडगे यांनी आभार मानले.