सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
एकतर्फी प्रेमातून तरुणाने आज सकाळी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. संगणकाच्या क्लासच्या निमित्ताने सहा महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या तरुणीवर अबरार मुलाणी याचे एकतर्फी प्रेम होते. नदीकाठी दोघे बोलत असताना तरुणी केवळ मैत्रीवरच ठाम राहिल्याने अबरारने गाडीच्या किल्ल्या आणि मोबाईल तिच्या हातात ठेवून नदीत उडी घेतली. साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधून काढला.
संजयनगरमधील आक्सा मशिदीजवळच्या पठाण मंझील मध्ये राहणारा अबरार आणि संबधित तरुणीची सहा महिन्यापूर्वीच ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्याने त्यांच्यात अधून मधून चर्चा होत असत. शनिवारी सकाळी सव्वासहा वाजता अबरारने वसतिगृहात राहणार्या संबधित तरुणीला फोन केला. बोलण्याचे निमित्त करुन तिला मोटारसायकलवरुन कृष्णानदीकाठावर असलेल्या स्वामी समर्थ मंदीरानजिक नेले. दोघे काहीवेळ बोलत बसले. तरुणीने आपण केवळ मित्रच आहोत. त्या पुढचे आपल्याला काहीहि शक्य नाही, असे सांगून टाकले. त्यानंतर तरुणाने गाडीची किल्ली आणि आपला मोबाईल तिच्याजवळ दिला. आलोच असे सांगून तो नदीकडे धावला.
त्याने नदीत उडी घेतली. तो पोहायला गेला असेल , असे समजून तरुणीही नदीकाठी गेली. त्यावेळी तो बुडत असल्याचे पाहुण तरुणीने आरडाओरडा केला. त्या परिसरात पोहणार्यांनी आपल्याकडची रबरी इनर अबरार याच्या दिशेने फेकली , परंतु तो पर्यंत तो बुडाला होता. काही वेळातच िअग्नशमन दल धावत आले. त्यांनी नदीत अबरारचा शोध घेतला. साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.