कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तालुक्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करताना कोणावरही सक्ती करू नये. मंडळे स्थापन करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊनच मंडपाचे नियोजन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरीता मंडपात निर्जंतुकीकरण करून घ्यावे. शक्यतो एक गाव एक गणपती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील यांनी केल्या.
आटके टप्पा येथे आयोजित कराड तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाची आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, उदय दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमारे 125 गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पोलीस पाटील उपस्थित होते.
डीवायएसपी डाॅ. रणजीत पाटील म्हणाले, गणेश मंडळांनी अनाठायी खर्च टाळून पुरग्रस्त गरजूंना मदत करावी. शासनाच्या अटी व नियमांचे भंग झालेस संबंधित मंडळाचे कार्यकर्ते यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी सर्व गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पाटील यांनी केले.
गणेशोत्सवात मिरवणूक काढू नये पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव काळात मार्गदर्शक सूचना व अटी नियमांचे पालन करून साधे पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणेचा सूचना केल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक मूर्ती ही 4 फूट उंचीची व घरगुती मूर्ती ही 2 फूट उंचीची असावी. तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी गणेश मंडळे उभी करू नयेत. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता गर्दी न करता समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे. मूतीच्या सरंक्षणात कायमस्वरूपी स्वयंसेवक उपस्थित ठेवावे. तसेच गणेशोत्सव आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये व गुलालाचा वापर करू नये अशा सूचना पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केलेल्या आहेत.