अहमदनगर प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून आवक मंदावल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथं सोमवारी कांद्याला १३ हजार रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच किरकोळ बाजारात गेल्या ८ दिवसांत कांद्याच्या दरांमध्ये प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याने नागरिकांना रडवायला सुरुवात केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत साठवणूकदार कांद्याची खरेदी करतात. ते भाव व सध्याचे भाव लक्षात घेतले तर सध्या उत्पादकांचा फायदा निश्चित असल्याचे जाणवत आहे. पण सध्या त्यांच्याकडे कांदा कमी आहे.
तीन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते. सध्या बाजारात भारी कांदा १३० तर हलका कांदा ८० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात सोमवारी २४ हजार ६७१ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १३ हजार, दोन नंबर कांद्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ५०० रुपये, तीन नंबर कांद्याला २ हजार ते २ हजार ९०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० व जोड कांद्याला २ हजार ते २ हजार ५०० रुपये भाव मिळाला.