औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजूर येथील राजुरेश्वराचे भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी आजपासून अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर लाईव्ह यु ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना आता घर बसल्या राजुरच्या गणरायाचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या राजूर येथील राजुरेश्वर आज या मंदिरात राज्यातून तसेच राज्याबाहेरून भाविक दर्शनासाठी रांगा लावत असतात. कोरोना संकट कमी झाल्यानंतर आज पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने आज मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाजपच्या आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वर याची सपत्नीक आरती देखील करण्यात आली.
कोरोनाचे निर्बंध किंवा इतर काही कारणांमुळे असंख्य भाविकांना इच्छा असूनही राजुरेश्वर याचे दर्शन घेता येत नाही. तसेच मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे देखील गाभार्यात जाऊन गणरायाचे मुखदर्शन घेता येत नाही. भाविकांची भक्ती लक्षात घेऊन राजूर येथील गणपती संस्थान राजूर ईश्वराचे भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी लाईव्ह यूट्यूब चैनल सुरू केले आहे. अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज ‘गजर राजुरेश्वराचा’ या लाइव्ह यूट्यूब चैनल चा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.