औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईनच पद्धतीने होणार आहेत. 29 जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. अशी माहिती मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी दिली आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल 202 च्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर विद्यार्थ्यांना पेपर देता येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाची नुकतीच बैठक होऊन परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार, 29 जुलैपासून बीए, बीएस्सी, बी कॉम द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर 10 ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 17 ऑगस्ट पासून घेण्यात येतील तर अभियांत्रिकी फार्मसी सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 20 ऑगस्ट पासून होणार आहे.