कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन 40 व्या युवा महोत्सवाचे गुरुवार, दि. 15 जुलै ते 17 जुलै या तीन दिवसीय कालावधीत आयोजन केले आहे. युवा महोत्सवाचे उद्घाटन “चला हवा येऊ द्या” फेम सिने कलावंत सागर कारंडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पांडूरंग पाटील हे असणार आहेत.
युवा महोत्सवामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठतंर्गत महाविद्यालयातील प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येकी तीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपल्या अविष्काराची संधी मिळणार आहे. या महोत्सवामध्ये गुरुवार, दि. 15 जुलै रोजी रांगोळी, मराठी वक्तृत्व, हिंदी वक्तृत्व, व्यंगचित्र, शास्त्रीय गायन, शास्त्रीय सुखाद्य इ. तसेच शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी भित्तीपत्रक, कातरकाम, सुगमगायन, पाश्चिमात्य वाद्यवादन, शास्त्रीय नृत्य, मेंहदी, एकपात्री अभिनय इ. त्याचबरोबर शनिवार, दि. 17 जुलै रोजी मातीकाम, इंग्रजी वक्तृत्व, स्थळचित्र, पाश्चिमात्य एकलगायन, नकलाव शास्त्रीय तालवाद्य इ. कला प्रकारांचा समावेश केला आहे. प्रत्येक दिवशी सकाळी ९.०० ते सायंकाळी 5.०० वाजेपर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी दिली.
या युवामहोत्सवाचे नियोजन संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पांडूरंग पाटील व संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळाचे सचिव व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य, डॉ. एस. बी. केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, समन्वय प्रा. डॉ. एस. आर. सरोदे, सहसन्मवयक प्रा. डॉ. एम. ए. कदम पाटील, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. ए. केंगार व सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक करत आहेत. या युवामहोत्सवामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष व वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.