औरंगाबाद – राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये 20 ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास शनिवारी परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात प्रवेश असणार आहे.
विद्यापीठाचे सलग्न 467 महाविद्यालय व विद्यापीठातील सर्व विभागातील अधिकारी, अध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोमिनोस पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्याची सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. कोरोना बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मात्र वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव ईश्वरसिंग मंजा यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोना कमी झाला असला तरी मास्क वापरणे, हात धुणे, निर्जंतुकीकरण करणे, सुरक्षित अंतर पाळणे या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप शहरातील महाविद्यालयांचे तसेच विद्यापीठाचे वस्तीगृह ताब्यात मिळालेले नाही.