आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत नियोजनाचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच; एक पेपर औरंगाबादला तर दुसरा नगरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील भरती परिक्षेच्या नियोजनातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. विविध पदांसाठी 24 आणि 31 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, विविध संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी ठेवण्यात आली आहे. शिवाय अनेकांना एका पदाच्या परीक्षेसाठी औरंगाबादला तर दुसऱ्या पदाच्या परीक्षेसाठी अहमदनगर येथे केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. यावरून राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील भरती परीक्षेचे नियोजन अद्यापही बिघडलेले असल्याचे दिसून येत आहे.

याआधी गट-क आणि गट-ड संवर्गातील पद भरतीसाठी 25 आणि 26 सप्टेंबरला परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु ऐन परीक्षेच्या काही दिवसा आधी प्रवेश पत्र एकाचे आणि छायाचित्र दुसर्‍याची असे प्रकार पाहायला मिळाले. याविषयी राज्यभरातून उमेदवारांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर ही परीक्षा परीक्षेच्या काही तासांपूर्वीच एक महिना पुढे ढकलण्यात आली. आता आठवडाभरावर ही परीक्षा आली आहे. अनेकांना प्रवेश पत्र मिळण्याची प्रतीक्षा अजूनही आहे. तर काही जणांना प्रवेश पत्र मिळाले आहेत, मात्र प्रवेश पत्र पाहून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा धक्का बसत आहे. प्रवेश पत्रांवर उमेदवारास संदर्भात परीक्षा केंद्राविषयी माहिती दिली आहे. गट-क संवर्गातील पदांसाठी 24 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. यात पदांची परीक्षा ही एकाच वेळेत आली आहे. त्यामुळे दोन पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे.

यात काहींना दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे एक परीक्षा देऊन दुसरी परीक्षा देण्यासाठी दुसरा जिल्हा गाठावा लागणार आहे. अथवा दुसऱ्या परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज भरल्याने हा प्रकार झाल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे स्थिती –
एका उमेदवाराला गृहवस्त्रपाल- वस्त्र पाल पदाच्या परीक्षेसाठी 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादेतील खाराकुंवा येथील केंद्र देण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजे दरम्यान ही परीक्षा होणार असून, या उमेदवाराला सांख्यिकी अन्वेषक पदासाठी अहमदनगर येथील केंद्र देण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी तीन ते पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. एकंदरीतच यावरून राज्य शासन आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत पुन्हा एकदा सावळागोंधळ करत असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Leave a Comment