सातारा | जिल्ह्यातील अवघड असणारा व ट्रेकर्सला भुरळ घातलेला किल्ले वासोटा हे पर्यटन स्थळ व ट्रेकिंगसाठी आजपासून दि. 23 सुरू होत आहे. त्यामुळ ट्रेकर्संना ही अत्यंत आनंदाची बातमी असून आता कास- बामणोलीसह वासोटा येथे पर्यटन व्यावसायाला पुन्हा एकाद गती येईल अशी आशा येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारापासून पुढे बामणोली येथे वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी एक ते दीड तास पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यानंतर नदीकाठावरून घनदाट जंगलातून पुढे ट्रेकला सुरूवात होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून वासोटा किल्ला पर्यटनसाठी बंद होता. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पर्यटनस्थळे खुली झाली आहे. प्रदीर्घ कालावधी नंतर पुन्हा किल्ले वासोटा ट्रेकिंग पर्यटक व ट्रेकर्स लोकांना खुणावू लागला आहे.
पूर्वी तापोळा व बामणोली येथूनच पर्यटक वासोट्यावर जावू शकत होते. मात्र, आता भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्रविमश्वर बोट क्लब, शेंबडी मठ, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोटक्लबमधून जाता येणे शक्य पर्यटकांना झाले आहे. शिवसागर बोट क्लब तापोळा, विशाल बोट क्लब तापोळा, काळेश्वरी बोट वानवली या ठिकाणाहून पर्यटक किल्ल्यावर जातात.
बोट क्लबप्रमाणे पर्यटकांची संख्याही वाढली आहे. पर्यटकांना सुविधा मिळाव्या यासाठी कास पठार परिसरासह बामणोली, पावशेवाडी, तेटली, वाकी, तापोळा परिसरासह मुनावळे, आंबवडे पर्यंत हॉटेल व टेंट व्यवसाय वाढला आहे. मात्र, यावर्षी वनविभागाने परवानगी शुल्कात वाढ केल्याने बोटीचे दरही वाढणार आहे.