हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात येत्या २-३ महिन्यात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) होणार असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती विरुद्व काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीत जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. दोन्हीकडून आमचंच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी आता ‘टाइम्स नाऊ नवभारत’ आणि ‘मॅटराइज’ या संस्थेने केलेला सर्वे समोर आला आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोणत्या पार्टीला किती मते मिळणार? याबाबतचा ओपिनियन पोल समोर आलेला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांची गरज लागते. टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइजच्या ओपिनियन पोल नुसार, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असं या सर्व्हेत दिसत आहे. भाजपला 95-105 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र यंदाच्या विधानसभेत फटका बसणार आहे. एकनाथ शिंदे गटाला केवळ 19-24 जागा मिळतील असा अंदाज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांना मात्र सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण दादा गटाला अवघ्या 7-12 जागा मिळणार असल्याचा दावा इम्स नाऊ नवभारत आणि मॅटराइजच्या ओपिनियन पोल मधून करण्यात आलाय. अन्य पक्षाना 11-16 जागा मिळतील
दुसरीकडे, महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षपुटीचा फटका बसल्याचे या ओपिनियन पोल मधून स्पष्ट दिसत आहे. तर काँग्रेस मात्र २०१९ च्या निवडणुकीला जेवढ्या जागा मिळाल्या त्या कायम राखण्यात यश मिळवेल. महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळतील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. असं असलं तरी महाविकास आघाडी सत्ता स्थापनेपासून बरीच लांब दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडवणारा असा हा सर्वे आहे. यावर आता राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.