हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत. राज्यातील शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शिवरायांची माफी मागितली आहे. शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, . तसेच राजकोट येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही केली. एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर सरकार म्हणून जे जे करणे आवश्यक होते ते ते सरकारने केले आहे. मात्र विरोधक अजूनही हा मुद्दा उचलून धरत असून या मुद्द्याच्या आधारावर महाराष्ट्रातच काहीतरी वेगळं करण्याचा विरोधकांचा डाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे.
विरोधकांनी विरोध करणे हे लोकशाहीमध्ये मान्य आहेच, पण या घटनेचा अवास्तव बाऊ करून विरोधक राज्यातील राजकारण आणि समाजकारणाला जो जातीय रंग देत आहेत तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी विरोधकांनी जी पातळी गाठली आहे तिला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली हे ठीक आहे. मात्र दुसरीकडे संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने शिवप्रेमींच्या भावना भडकवल्या जात आहेत.
खरं तर राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर यापैकी एकही नेता या शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या दर्शनासाठी गेलेला नव्हता. मात्र महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हे नेतेमंडळी जागी झाली आणि राजकोटकडे गेले, तिथेही राणे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये राडा झालाच. राजकोट किल्ल्यावर पक्षाचे मशाल असलेले झेंडे फडकत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीवर विरोधकांच्या आततायी वृत्तीमुळे राजकारणाचा फड रंगला, असे सिंधुदुर्ग वासियांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राला विवेकशील, बुद्धिमान आणि दूरदर्शी विरोधी पक्ष नेत्यांची उज्वल परंपरा आहे. मुद्द्यावर बोलून लोकशाही मार्गाने सरकारला स्लो कि पळो कडून सोडणारे विरोधक आपण याच महाराष्ट्रात बघितले आहेत. मात्र आज विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनी या उज्वल परंपरेला कलंक लावला आहे. राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये राजकोटवर जो काही राडा सुरु होता त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली परंतु त्यात सरकार वर टीका करण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही मुद्दा नव्हता. तसेच त्यांच्या पत्रकार परिषदेला सपशेल जातीय रंग दिसून येत होता, अशी भावना ही पत्रकार परिषद पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.
विरोधकांकडून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना टार्गेट केलं जात आहे. आजपर्यंत कोणत्याही विरोधी नेत्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचा जातीय उल्लेख कधीही केला नव्हता. मात्र “पेशव्यांचे वंशज” अशा शब्दात विरोधकांकडून फडणवीसांची हेटाळणी देखील करण्यात आली. फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी अन्य कोणताही मुद्दा नसल्याने त्यांची जात काढली जात असल्याचे दिसून आले. शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून जे काही राज्यात घडतंय ते पाहता शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर होण्याची केलेली भाषा पुनः एकदा चर्चेत येत आहे. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी भावना पुण्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना गोळा करून स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्राची आज जी काही ओळख आहे ती छत्रपती शिवरायांच्या सर्व समावेशक धोरणामुळे. मात्र त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या विरोधकांनी विद्वेषाची आणि जातीय राजकारणाची बीजे महाराष्ट्रात रोवली आहेत असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.